पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागात समन्वय नसल्याचा प्रकार समोर आला आहे. पथ विभागाने सर्व विभागांंना नोटीस पाठवत दि. ३० एप्रिलपूर्वी खोदाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने हे आदेश मनावर घेत सिमेंट रस्त्याची खोदाई केली आहे.
स्वारगेट – सारसबाग रस्त्यावर गणेश कला क्रीडा मंचाच्या समोर हा प्रकार समोर आला आहे. एप्रिल २०१९ मध्ये प्रकल्प व्यवस्थापन विभागाने हा “पीपीपी’अंतर्गत विकसित केलेला सिमेंट रस्ता मधोमधच खोदला आहे. त्यामुळे या कामाचे पैसेही अद्याप फिटलेले नाहीत.
खोदाईमुळे या रस्त्याचा दोष दायित्व कालावधीही संपुष्टात आला आहे. महापालिकेने २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले आहे. ज्या-ज्या भागांत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत, त्याचा नकाशा करून त्यानुसार आधी जलवाहिन्या टाकाव्यात. नंतरच रस्ते करावेत, असा निर्णय झाला होता. मात्र, सुरूवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या भागात स्वारगेट येथे पाणीपुरवठा केंद्र असतानाही जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्याचवेळी येथे मेट्रोचेही काम सुरू झाले होते. मात्र, आता अचानक जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाने पूर्व नियोजन न करता थेट रस्ता खोदाई सुरू केली आहे.
प्रत्यक्षात खोदाई सुरू करण्यापूर्वी तेथे माहिती फलक, बॅरिकेट्स न लावता थेट खोदाई सुरू केली आहे. ही जलवाहिनी महत्त्वाची होती आणि नंतर रस्ता खोदला जाणार आहे, याची कल्पना असताना तो डांबरी न करता काॅंक्रीटचा का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पथ विभागाने केले हात वर
महापालिका आयुक्तांनीच या रस्ता खोदाईस परवानगी दिली आहे, असे सांगत पथ विभागाने पुन्हा एकदा हात वर केले आहेत. विशेष म्हणजे, अशी खोदाई होत असताना प्रशासनाने आधी नागरिकांना कल्पना देणे आवश्यक आहे. पूर्ण रस्ता खराब होणार नाही, अशा पद्धतीने खोदाई आवश्यक आहे.
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूलाचे काम सुरू असून, त्यासाठी खोदाई करताना आधी कटरने सिमेंत रस्ता कापण्यात आला. त्यामुळे नंतर तो दुरूस्त करणे सोपे झाले. मात्र, येथे रस्ता थेट फोडल्याने जवळपास १० ते १५ वर्षे आयुष्य असलेला हा रस्ता पाच ते सहा वर्षांतच खराब होणार आहे.