Kabutar Khana : कुबतरांमुळे एकही मृत्यू नाही, लवकरच सुरु होणार मुंबईतील कबुतरखाने? मनेका गांधींनी स्पष्ट सांगितलं

Kabutar Khana : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सुप्रीम कोर्टासह मुंबई हायकोर्टाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे प्राणी प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यावरून आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांनी कबुतराखान्यांवरील बंदीवरुन भाष्य केलं आहे.
त्या म्हणाल्या “कोणता देश जिवंत राहील आणि कोणता देश मरेल, कोणाची जंगले तोडली जातील, कोण चांगले करेल आणि कोण वाईट करेल हे पर्यटक ठरवतात. भारतातील पर्यटन हे अगदी लहान देशांपेक्षाही कमी आहे आणि आपण अधिक हॉटेल्स आणि रस्ते बांधण्याचा विचार करतो, परंतु आपण जितके जास्त झाडे तोडू आणि प्राणी मारू तितके कमी पर्यटक येतील” असं म्हणत मनेका गांधी यांनी पर्यावरणाबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.
दादरचा वादग्रस्त कबुतरखाना पूर्णपणे बंद
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई केल्यामुळे दादरचा वादग्रस्त कबुतरखाना पूर्णपणे बंद झाला आहे. या परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. गेल्या महिन्यात हायकोर्टाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे आदेश कायम ठेवल्याने पक्षी प्रेमींना माघार घ्यावी लागली. कबुतरखान्यांमुळे शहरातील पर्यावरण आणि मानवी आरोग्याशी निगडित समस्या, आजार उद्भवत असल्याने कोर्टाने बंदीचा आदेश दिला होता. कोर्टाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी सुरू केली.
काय म्हणाल्या मनेका गांधी?
यासंदर्भात बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, गेल्या 10 वर्षांत 21 लाख हेक्टर जंगल तोडण्यात आलं आहे. जंगलात काय उरलं आहे?’ “मला वाटतय की देवही पळून गेला आहे. सगळं चार धाम काँक्रीटने भरलं आहे. आता तिथे गेल्यावर माझं मन तुटेल” असं मनेका गांधी म्हणाल्या.
पुढे बोलताना म्हणाल्या, आपण प्राण्यांना खायला देऊ किंवा देऊ नये, त्यांना पाहू नये, पण प्रत्येकाच्या मनात हे असते की आपण जगले पाहिजे आणि त्यांनी जगले पाहिजे. कबुतराने आजपर्यंत कधीही कोणाचे नुकसान केलेले नाही. जगात त्याच्यामुळे कोणीही मरण पावले नाही. मुंबईत 57 कबुतरखाना आहेत,चार-पाच कबुतरखाना तोडले. मुख्यमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे आणि जेव्हा ती समिती आपला मत देईल तेव्हा कबुतरखाना पुन्हा एकदा बांधला जाईल” असं मनेका गांधी यांनी म्हटले आहे.





