अवैध कबुतरखान्यावर महापालिकेची कडक कारवाई !

मुंबई – अवैध कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगत सुरू करण्यात आलेल्या अवैध कबुतरखान्यावर अनधिकृरीत्या खाद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
महापालिकेतर्फे कबुतरांना खाद्य टाकणे व त्याची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असतानाही मुंबईतील अनेक ठिकाणी पालिकेच्या नियमांना बगल देत कबुतरांना खाद्य टाकले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलालगत अनधिकृतरित्या कबुतरांना खाद्य टाकण्यात येत होते. प्रशासनाचा डोळा चुकवत खाद्य विक्रीही केली जात होती.
माहिती मिळताच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. खाद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटताच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.





