Dadar Kabutar Khana : कबूतरखान्यासंदर्भात 13 सदस्यीय समितीची स्थापना; मानवी आरोग्यावर कबुतरांच्या परिणामांचा होणार अभ्यास

Dadar Kabutar Khana : दादर येथील ऐतिहासिक कबूतरखाना बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य धोक्यांमुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास बंदी घातली होती.
या कारवाईला जैन समाजाने तीव्र विरोध दर्शवला होता. आता, मुंबई उच्च न्यायालयाच्या १३ ऑगस्ट २०२५ च्या आदेशानुसार, कबुतरांच्या खाद्यामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी १३ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीची स्थापना आणि उद्दिष्टे
उच्च न्यायालयाने या समितीला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, पशुवैद्यकीय विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र आणि फुप्फुसरोग तज्ज्ञांचा समावेश आहे
समितीची प्रमुख कार्ये काय?
1. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास.
2. कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवणारे आरोग्य धोके, जसे की श्वसनाचे आजार, यांचे विश्लेषण.
3. कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याच्या शक्यतांचा अभ्यास आणि त्यासाठी नियमावली तयार करणे.
4. याचिकाकर्त्यांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करून योग्य तोडगा शोधणे.
समितीची रचना
अध्यक्ष : विजय कंदेवाड, संचालक, सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे
सदस्य सचिव : जितेंद्र भोपळे, संचालक, नगर रचना विभाग
सदस्य :
1. किशोर रिठे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
2. डॉ. प्रदीप देशमुख, प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसीन, एम्स, नागपूर
3. डॉ. शिवाजी पवार, उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
4. डॉ. एस. के. दत्ता, सचिव, प्राणी कल्याण मंडळ
5. डॉ. सुजित रंजन, फुप्फुसरोग तज्ज्ञ
6. डॉ. अमिता आठवले, फुप्फुसरोग तज्ज्ञ, मुंबई महापालिका
7. डॉ. मनीषा मडकईकर, संचालक, आयसीएमआर, रोगप्रतिकारशक्ती तज्ज्ञ
8. डॉ. आर. जे. झेंडे, प्राध्यापक, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्यशास्त्र विभाग
9. डॉ. शिल्पा पाटील, सहयोगी प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, ग्रँट मेडिकल कॉलेज व जेजे हॉस्पिटल
10. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका
11. एक अतिरिक्त तज्ज्ञ (नाव जाहीर न झालेले).





