“मलेशियात सुट्टी घालवण्यासाठी वेळ, पण…”; राहुल गांधींच्या अनुपस्थितीवरुन भाजपचा हल्लाबोल

BJP Vs Rahul Gandhi | भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित या खास समारंभात पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, हमीद अन्सारी आणि जगदीप धनखड यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. परंतु विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली नाही. यावरून भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीवर हल्ला चढवला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया मंच X (ट्विटर) वर पोस्ट करत राहुल गांधींवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधींना भारतीय संविधान आणि लोकशाहीचा तिरस्कार आहे. काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभालाही ते उपस्थित नव्हते आणि आता उपराष्ट्रपतींच्या शपथविधीपासूनही ते दूर राहिले.
राहुल गांधींना मलेशियात सुट्टी घालवण्यासाठी वेळ, पण…
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, ‘राहुल गांधी भारतीय संविधानाचा द्वेष करतात. राहुल गांधी भारतीय लोकशाहीचा द्वेष करतात. राहुल गांधींनी उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचा बहिष्कार केला. काही दिवस आधी त्यांनी लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्य उत्सवाचा बहिष्कार केला होता.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा आणि संवैधानिक मान्यवराच्या शपथविधी समारंभाचा तिरस्कार करणारा व्यक्ती सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र असू शकतो का? राहुल गांधींना मलेशियात सुट्टी घालवण्यासाठी वेळ आहे, पण अधिकृत संवैधानिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नाही. राहुल गांधी हे भारताच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत.’ BJP Vs Rahul Gandhi |
काँग्रेसकडून राहुल गांधींचा बचाव
राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेस नेते उदित राज पुढे आले. त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षाच्या नेत्याने प्रत्येक सरकारी कार्यक्रमात सहभागी होणे बंधनकारक नाही. काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले आणि खरे तर भाजपच संविधान कमकुवत करत आहे, तर राहुल गांधी ते वाचवण्यासाठी लढत आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे 15 वे उपराष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष समर्थित उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला होता. राधाकृष्णन आता 11 सप्टेंबर 2030 पर्यंत उपराष्ट्रपतीपदावर राहतील. राधाकृष्णन यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. BJP Vs Rahul Gandhi |
हेही वाचा:
‘तो’ व्हिडीओ ठरला गोळीबार हल्लाचं कारण; मोठी माहिती समोर! असं काय म्हणाली होती खुशबू पटानी?





