कबुतरखाना बंद की सुरु राहणार? आज उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी, परिसरात पोलिस बंदोबस्त

Kabutar Khana Dadar | कबुतरखान्यांसंदर्भात जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी दादरच्या कबुतरखाना परिसरात मोठा गोंधळ झाला होता. यानंतर आज कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. कबुतर खाने कायमचे बंद करायचे की त्यांना दुसरी सोय करायची याचा निर्णय कोर्ट देणार आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू केली. यावर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही बुधवारी दादरमध्ये जैन समाजाच्या आंदोलन केले. त्यांनी ताडपत्री फाडून परिसरात प्रवेश केला आणि पोलिसांशी वाद घातला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Kabutar Khana Dadar |
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम
दादरमधील कबूतरखान्याजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या भागात दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज गुरुवारीही परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आज सकाळी साडेसहा वाजता सुरु होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kabutar Khana Dadar |
हेही वाचा :





