मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंचे आंदोलन रोखले, वकील सदावर्ते म्हणाले – ‘मुंबईत आलेच तर जेलमध्ये जावे लागणार’

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर जोरदार टीका करत त्यांना थेट जेलचा इशारा दिला आहे.
सदावर्ते म्हणाले, “जरांगेंनी परवानगीशिवाय आंदोलनाचा प्रयत्न केला, तर त्यांना तुरुंगात जावे लागेल. मुंबईत कायदा चालतो, जरांगे नाही. त्यांची भाषा मग्रुरीची असून, ते कुणाच्या तरी हातातील बाहुले बनले आहेत. त्यांचे बेकायदा कृत्य यापुढे खपवून घेतले जाणार नाही.”
सदावर्ते यांनी पुढे सांगितले की, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत, त्यापैकी एक माझी स्वतःची आहे. न्यायालयाने आझाद मैदानावर परवानगीशिवाय आंदोलनास मनाई केली आहे. “हा आदेश डंके की चोटपर आहे. जरांगे कायदा आणि संविधानापेक्षा मोठे नाहीत,” असे सदावर्ते यांनी ठणकावले.
सदावर्ते यांनी जरांगेंच्या कथित गॉडफादरलाही इशारा देत म्हटले, “जरांगेंना आता आझाद मैदानात प्रवेश नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.” जरांगेंच्या आंदोलनाचा आत्मा राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी केला. “लोकांची आई-बहीण काढणारी जरांगेंची भाषा गंभीर गैरवर्तन आहे. त्यांनी कायद्याचे पालन करावे,” असे सदावर्ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेंना भेटण्यास गेले असले, तरी हा लोकशाहीचा भाग असल्याचे सदावर्ते यांनी नमूद केले. न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असून, जरांगे यांनी तो डोक्यात घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.





