मुंबईत पुन्हा कबुतरखाने उभारणार; पालिकेने चार नव्या ठिकाणांचा घेतला आढावा

मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर मुंबई महापालिका आता चार ठिकाणी मर्यादित स्वरूपात कबुतरखाने सुरू करण्याचा विचार करत आहे. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर, आरे मिल्क कॉलनी, वडाळ्याजवळील खारफुटी पट्टा आणि गोराई परिसराचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील कबुतरखाने बंद केले. यानंतर जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत पुन्हा कबुतरखाने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली होती. यानंतर पालिकेच्या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कबुतरखान्यांसाठी संभाव्य जागांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यावर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर, आरे मिल्क कॉलनी, वडाळ्याजवळील खारफुटी पट्टा आणि गोराई परिसर या चार ठिकाणांचा विचार करण्यात आला. या ठिकाणी मानवी वस्ती नसल्याने कबुतरखाने खाने स्थापन करण्यासाठी या जागा योग्य असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.





