लखनौ – उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष एमआयएमबरोबर आघाडी करणार असल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाली आहे. तथापि, याचा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी साफ इन्कार केला आहे. या बातमीत जराही तथ्य नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.
बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
त्यामुळे कॉंग्रेसलाही स्वबळावर तेथे लढल्याशिवाय पर्याय नाही. उत्तर प्रदेशातील मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाली होती, पण त्यांच्या पदरी साफ निराशा आली होती.
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातही आघाडी झाली होती, पण त्यावेळीही त्यांच्या पदरी निराशा आली होती. आता तर तेथे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.