नवी दिल्ली – संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्षपदी शनिवारी ललन सिंह या नावाने ओळखले जाणारे खासदार राजीव रंजन यांची निवड करण्यात आली. त्यांच्याकडे जेडीयूचा प्रमुख चेहरा असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा निष्ठावान सहकारी म्हणून पाहिले जाते.
नितीश पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर ती जबाबदारी आर.सी.पी.सिंह यांच्याकडे सोपवण्यत आली. मात्र, सिंह यांची नुकतीच केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली. त्यामुळे त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यापार्श्वभूमीवर, नितीश यांच्या उपस्थितीत दिल्लीत जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीत नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ललन सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
नितीश पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यावर विश्वास दाखवला. बिहारमध्ये अनेक वर्षे सत्तेत असणारा जेडीयू हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक आहे.
भाजपने यावेळी बिहारमध्ये अधिक जागा जिंकल्याने जेडीयूला लहान भावाची भूमिका निभवावी लागत आहे. त्यामुळे जेडीयूला पुन्हा मजबूत बनवण्यासाठी नितीश प्रयत्नशील असल्याचे मानले जाते. त्यातून ललन सिंह यांची निवड महत्वाची मानली जात आहे.