-->

बंधाऱ्यावरील ढापे काठावरच धूळखात

नीरेवरील बंधाऱ्यांची स्थिती : पाणीसाठा कमी होणार

निमसाखर – इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातून वाहणाऱ्या नीरा नदीच्या बंधाऱ्यावरील सर्व ढापे टाकणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही निमसाखरसह अन्य ठिकाणी बंधाऱ्यावरील ढापे पूर्ण टाकावेत. त्यामुळे शेतीला मोठा फायदा या पाण्याचा होऊ शकतो. मात्र, संबंधित प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकऱ्यांतून होत आहे. संबंधित विभागाकडून बंधाऱ्यावर ढापे बसविले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ यांनी दिला आहे.

निमसाखर गावापासून काही अंतरावर नीरा नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. निमसाखर, निरवांगी, खोरोची नदीवर बंधारे आहेत. या भागात देखील 50 ते 60 टक्‍के बंधाऱ्यात यापूर्वीच ढापे टाकलेले आहे. पाऊस जरी बंद झाला असला तरी मोजक्‍याच ठिकाणी अद्यापही ओढे वाहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. सध्या सर्व बंधाऱ्यांवरील सर्व ढापे टाकून पाणी अडविणे गरजेचे आहे. मात्र, अजून सर्व ढापे टाकले नसल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी नदीचे पाणी डिसेंबरअखेर ते जास्तीत जास्त जास्त जानेवारीच्या सुरूवातीपर्यंत राहत होते. मात्र यावर्षी पावसामुळे हे पाणी साधारण फेब्रुवारीअखेर ते मार्चच्या सुरूवातीच्या काळात टिकून राहिल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नीरा नदीवरील बंधाऱ्याचे सर्व ढापे टाकून पाणीसाठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

पाणीसाठा करा; अन्यथा आंदोलन
निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ म्हणाले की, नीरा नदीमुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागतो. वास्तविक नदीवरील सर्व ढापे 15 आक्‍टोंबरपर्यंत टाकणे गरजेचे असते. मात्र, यावर्षी आक्‍टोंबरला मुसळधार पाऊस झाल्याने ढापे त्यावेळी टाकणे धोकादायक होते. मात्र, सध्या ढापे टाकण्यासाठी कुठलीही अडचण नाही. संबंधीत ठेकेदाराकडून उशीर झाल्यास पाणीसाठा झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.