रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच लावले लग्न

विवाहानंतर तरुणाने ठोकली धूम; अत्याचार करून फसविल्याचा गुन्हा

चाकण – एखाद्या चित्रपटातील कथा असावी, अशी घटना चाकण येथे बुधवारी घडली. लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीने औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणीच्या समाजातील नागरिकांसह तिच्या नातेवाईकांनी फसवणूक करणाऱ्या तरुणाला धरून आणले आणि रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच दोघांचे लग्न लावून दिले. लग्नाचे सोपस्कार पार पडल्यानंतर “त्या’ तरुणाने रुग्णालयातूनच धूम ठोकली. या प्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर बलात्कार केल्याची तक्रार पीडित 26 वर्षीय तरुणीने चाकण पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी बुधवारी (दि. 4) युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

सुरज भारत नलावडे (मूळ रा. नावडी, जि. सातारा, सध्या रा. चाकण) याच्यावर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ऍट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

सुरज व त्या तरुणीची गेल्या वर्षी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सुरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. सोमवार ( दि. 29 एप्रिल 2018 ) सायंकाळी सुरज याने तिच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून तिला चाकण मार्केटयार्ड मधून त्याच्या दुचाकीवर बसवून चाकण येथील राणूबाई मळा येथे त्याच्या राहत्या घरी आणले.

लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात तरुणीने सुरज याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता आपण एका जातीचे नाही, असे म्हणून तिला भेटण्याचे टाळू लागला. त्यामुळे तिने थेट सुरज याचे घर गाठून याबाबत त्याच्या घरच्यांना विचारणा केली. त्यांनी दोघांच्या लग्नास नकार देताच त्या पीडित तरुणीने सुरज याच्या घरात सर्वांच्या समोर फिनेल नावाचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तरुणीने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी सुरज नलावडे याच्या विरोधात ऍट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीवर अन्याय झाल्याचे आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजताच काही संघटनांच्या प्रतिनिधींनीना कळाले. त्यांनी सुरजला पकडून आणले आणि रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लग्न लावून दिले होते. मात्र संघटनेच्या दबावातून तरूणाने लग्नाचे सोपस्कार उरकले आणि हॉस्पिटलमधून धूम ठोकली.

Leave A Reply

Your email address will not be published.