नवी दिल्ली – भाजपचे खासदार असणारे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यासह दिल्लीतील काही नेत्यांना करोनावरील औषधांची खरेदी आणि त्यांचे वाटप महागात पडण्याची चिन्हे आहेत. संबंधित प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
करोना संकटकाळात देशभरात विविध औषधांची आणि वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनची टंचाई असल्याचे चित्र पुढे आले. त्या टंचाईमुळे जनसामान्यांना धावाधाव करावी लागत आहे. त्याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधे मिळवणाऱ्या राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
गंभीर यांच्या व्यतिरिक्त प्रीती तोमर आणि प्रवीण कुमार या आपच्या आमदारांवर ऑक्सिजन साठा खरेदीचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून चौकशीचा आदेश न्यायालयाने दिल्लीच्या औषध नियामक यंत्रणेला दिला आहे. तो आदेश देताना न्यायालयाने गंभीरबाबत विशेष टिप्पणी केली.
गंभीर यांनी केलेली कृती चांगल्या हेतूने असेल. मात्र, तुटवडा असणाऱ्या औषधांच्या खरेदीची कृती जबाबदारपणाची आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. औषध वाटप करण्यासाठी राजकीय नेते डॉक्टर किंवा औषध विक्रेते नाहीत. त्यांना तसे अधिकारही देण्यात आलेले नाहीत, असे संबंधित याचिकेत नमूद करण्यात आले आहे.