नवी दिल्ली – केरळमधील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या मालिका बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी तेथे प्रार्थना सभा सुरू होती. याप्रकरणी 48 वर्षीय डॉमिनिक मार्टिनने बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केले.
आता त्याने इंटरनेटवरून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा कबुलीजबाब दिला आहे. मार्टिनने सांगितले की, हा बॉम्ब बनवण्यासाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च झाले आहेत. मार्टिनने आखाती देशात फोरमॅन म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. तिथेच तो इलेक्ट्रॉनिक उपकरणे ऍसेम्बल करायला शिकला होता.
केरळ बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या डॉमिनिक मार्टिनचे कुटुंब पाच वर्षांहून अधिक काळ कोचीजवळ भाड्याच्या घरात राहत असून, ते स्वत: आखाती देशात काम करत होते. दोन महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट मालिका करण्यासाठी तो आखाती देशातून केरळमध्ये परतला होता. स्फोटासाठी वापरण्यात आलेले आयईडी हे कमी दर्जाच्या स्फोटकांपासून बनलेले होते, ज्याचा वापर फटाक्यांमध्ये केला जातो.
आरोपी मार्टिनने आपल्या घरी आयईडी एकत्र केले आणि ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या’ अधिवेशनाला उपस्थित असलेल्या लोकांना मारण्याच्या उद्देशाने स्फोटकं कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ठेवली. आत्मसमर्पण करण्यापूर्वी मार्टिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेशही पोस्ट केला होता.
त्यात त्याने दावा केला आहे की, बॉम्बस्फोट घडवण्याचा निर्णय समाजाचे शिक्षण ‘देशविरोधी’ असल्याने त्यांनी घेतला. समाज मोठ्यांना तसेच लहान मुलांना चुकीचे संस्कार शिकवत आहे. ते थांबवण्याचे आवाहनही त्ययाने केले होते मात्र त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ही शिकवण देश आणि समाजासाठी चुकीची असल्याचे लक्षात येताच त्यांनी मालिका बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा निर्णय घेतला, असा दावा मार्टिनने केला.