मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी होणार आहे. जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकरांना ३० तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र उद्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या निकालाचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होणार का? हे पाहणे महत्वाचे असेल.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार काही जणांचे ऐकतात आणि मनमानी पद्धतीने कारभार करतात म्हणून आम्ही वेगळा निर्णय घेतला होता असे म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ अंतर्गत सुनावणी घेण्यात येणार आहे. अजित पवार गटाने स्वतःहून राजकीय पक्ष सोडल्याने त्यांना अपात्र करावे, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. ही सुनावणी शिवसेनेपेक्षा थोडी वेगळी असल्याने तसेच पूर्ण होणार असल्याने ३१ जानेवारी रोजी निकाल देणे शक्य नाही. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सात दिवसांची मुदतवाढ मागू शकतात, अशी शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल दिला. भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन्हीही आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.