पुणे :– येत्या 30 ऑक्टेबर ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान गोव्यात खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांचे नेतृत्व आशियाई स्पर्धेतील मिश्र दुहेरीची सुवर्णविजेती ऋतुजा भोसले व आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन कढे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मडगाव येथील फातोर्डा टेनिस संकुलात टेनिसच्या स्पर्धा होणार आहेत.
महाराष्ट्राच्या संघांमध्ये गुणवान युवा खेळाडू व अनुभव यांचे मिश्रण असून भविष्यात दर्जेदार संघबांधणी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून हे संघ निवडण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
गुजरात येथे झालेल्या गेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी सर्वाधिक पदके जिंकली होती. त्या स्पर्धेत महाराष्ट्राने तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळवली होती. अर्जुन कढे याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या बलाढ्य पुरुष टेनिस संघात डेव्हिस चषक स्पर्धेचा अनुभव असलेल्या पूरव राजासह अथर्व शर्मा, सिद्धांत बांठिया व अनुप बंगार्गी यांचा समावेश आहे. तर ऋतुजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिला संघात माजी ऑलिम्पिकपटू व दुहेरी विशेषज्ञ प्रार्थना ठोंबरेसह ब्रिक्स स्पर्धेतील कांस्यविजेती वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तुरे व वासंती शिंदे या खेळाडूंचा समावेश आहे.
पुण्याच्या अन्वित बेंद्रे यांची पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी, तर पुण्याच्याच केदार शाह यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे हिमांशू गोसावी दोन्ही संघांचे व्यवस्थापक असतील, तर अपूर्वा कुलकर्णी फिजिओथेरपिस्ट म्हणून संघासोबत राहतील.
महाराष्ट्राचे संघ –
पुरुष संघ – अर्जुन कढे, पूरव राजा, अथर्व शर्मा, सिद्धांत बांठिया व अनुप बंगार्गी. प्रशिक्षक – अन्वित बेंद्रे. (पुणे).
महिला संघ – ऋतुजा भोसले, प्रार्थना ठोंबरे, वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तुरे व वासंती शिंदे. प्रशिक्षक – केदार शाह (पुणे). व्यवस्थापक – हिमांशू गोसावी (पुणे). फिजिओ – अपूर्वा कुलकर्णी (पुणे).