चेन्नई: राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरन हिने काल रात्री कारागृह अधिकाऱ्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. नलिनीची दुसऱ्या एका महिला कैद्याबरोबर भांडण झाले होते. नलिनी आपली छळवणूक करीत आहे अशी तक्रार तिने कारागृह अधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यानुसार नलिनीची चौकशी करण्यासाठी तुरूंग अधिकारी चौकशीसाठी गेले असता तिने त्यांना आत्महत्येची धमकी दिली. या आधी तिने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची बातमी प्रसारित झाली आहे. पण त्यात तथ्य नसल्याचे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
55 वर्षीय नलिनी ही सध्या राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून गेली तीन दशके ती कारागृहात आहे. तिला सध्या वेल्लोरच्या महिला कारागृहात ठेवण्यात आले आहे.नलिनीने आपला कारागृहात छळ चालवला असल्याची तक्रार दुसऱ्या एका महिला कैद्याने केली आहे. या महिला कैद्याने आपल्याला नलिनीपासून वेगळे ठेवावे अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
तथापि, तिला तेथून हलवण्यास नलिनीने विरोध दर्शवला. तिला येथून हलवले तर आपण आत्महत्या करू, अशी धमकी नलिनीने अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, नलिनीच्या वकिलांनी असा आरोप केला की, जेलच्या अधिकाऱ्यांनीच नलिनीचा तुरुंगात छळ चालवला आहे, काल तिची एका अधिकाऱ्याबरोबर शाब्दिक चकमक झाल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तुरूंग अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. फक्त तिने आत्महत्येची अधिकाऱ्यांना धमकी दिली.