मुंबई – झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांचं एक भन्नाट समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार ‘सुपरहिट’ चित्रपट दिले आहेत. नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन येणारे झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एक जबरदस्त चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. ‘घर बंदूक बिर्याणी’ असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता.आता नागराज मंजुळेने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
चित्रपटाचा टीझर पाहून काहीतरी भन्नाट आहे, हे कळतेय. पोलीस आणि नक्षलवाद्यांची झुंज यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. नागराज मंजुळे यांना एक पोस्टर शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. नागराज यांनी शेअर केलेलं पोस्टर देखील खूप हटके आहे. यामध्ये बिर्याणी तयार होताना दिसत असून त्याच्या बाजूला दोन बंदुका देखील दिसत आहेत. बिर्याणीच्या पातेल्यावर 30 मार्च 2023 ही चित्रपटाच्या रिलीजची तारीख लिहिली आहे.
View this post on Instagram
“आशेच्या भांगेची नशा भारी…झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवाकोरा चित्रपट ‘घर, बंदूक, बिरयानी’ ३० मार्च २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित” असं कॅप्शन देखील यावेळी नागराजने या पोस्टसाठी दिले आहे.
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हटके टीजरमुळे प्रेक्षकांना आता या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज, नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.