नवी दिल्ली – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक अधिकारी पी सी मोदी यांच्याकडे मुर्म यांच्या उमेदवारी अर्जाचा संच सुपूर्द केला.
यावेळी मुर्मू यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि पीयूष गोयल, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, बी एस बोम्मई, भूपेंद्र पटेल, हिमंता बिस्वा सरमा, पुष्कर धामी यांच्यासह अनेक मुख्यमंत्री व नेते उपस्थित होते.
भाजपच्या नेत्यांव्यतिरिक्त, वायएसआर कॉंग्रेसचे व्ही विजयसाई रेड्डी आणि बीजेडी नेते सस्मित पात्रा, जे एनडीए युतीचा भाग नाहीत, ते देखील त्यांच्या नामांकनाला पाठिंबा देण्यासाठी संसदेत उपस्थित होते. जेडीयुचे राजीव रंजन सिंग, अद्रमुकचे पनीरसेल्वम आणि थंबी दुराई हे नेतेही यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती पदासाठीच्या अर्जावर 50 सूचक आणि 50 अनुमोदक लोकप्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा स्वाक्षऱ्यांसह त्यांच्या अर्जाच्या अनेक प्रति निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्या आहेत.