कोरेगाव -गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव (वय 35) यांचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजीक शिवार रस्त्यावर खून झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. हा खून दोन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मंगेश जाधव हे गोगावलेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व नाथ समाजाचे जिल्हा पदाधिकारी होते. ते कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या खाजगी वाहनावर चालक म्हणून एक वर्षापासून काम करत होते. ते कामावर जाण्यासाठी काल (दि. 4) सकाळी 10.30 च्या सुमारास
गोगावलेवाडीतून निघाले. ते रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आई व पत्नी यांनी त्यांच्या दोन्ही मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही क्रमांक स्विच ऑफ होते. त्यामुळे दोघींनी नातेवाइकांकडे चौकशी केली. त्यांनीदेखील मंगेश आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले. मंगेश जाधव यांची आई शोभा यांनी शेजारी राहणाऱ्या यश बेबलेला बरोबर घेऊन गुरुवारी सकाळी 7.30 वाजता कोरेगाव उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथे त्यांनी गाडीचे मालक व अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली.
तेव्हा, मंगेश हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णालयात होते, त्यानंतर कोठे गेले, ते माहीत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी शोभा जाधव या कोरेगाव पोलीस ठाण्यात गेल्या. तेथून पोलिसांनी त्यांना धोम डाव्या कालव्यानजीक शिवार रस्त्यावर नेले. तेथे रस्त्याकडेला पडलेला मृतदेह पोलिसांनी दाखविला. तो मृतदेह मंगेशचा असल्याचे शोभा जाधव यांनी ओळखले. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे तपास करत आहेत.
वादातून खून झाल्याचा संशय
मंगेश जाधव यांचा खून हा वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि अर्चना शिंदे, संतोष साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, रहिमतपूरचे सपोनि गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांना तपासाबाबत सूचना दिल्या. मंगेश जाधव यांच्याशी ज्यांचे वाद झाले होते, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.