पिंपरी – महापालिका सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना महापालिकेच्या वतीने 25 लाख रुपये आर्थिक मदत करण्यात येत आहे. यापूर्वी काही वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे आदी उपस्थित होत्या. यावेळी वाहन चालक अकबर सय्यद, ह क्षेत्रीय मुकादम रमेश जगताप, सहायक शिक्षक राजेंद्र तुपे, शिपाई काळुराम नलावडे, मुख्य लिपिक विनायक फापाळे, स्टाफनर्स अलका साळवे, लिपिक मोहन डिगोळे, सफाई कामगार रामदास राखपसरे, प्लंबर पंडीत कुटे यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या, करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या दु:खात महापालिका सहभागी आहे. अचानक उद्भवलेल्या करोना विषाणु संसर्गामुळे देशात लाखो जणांचा मृत्यु झाला. महापालिकेतील काही कर्मचारी बंधू भगिनींचा देखील करोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास 25 लाख इतकी मदतीची रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे. मुलांचे शिक्षण व भविष्य घडविण्यासाठी रकमेचा वापर करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.