नगर – सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी लाक्षणिक सत्याग्रह करण्याची पूर्वकल्पना देऊन महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात काम बंद ठेवून अचानक संप केला. यात सफाई कामगारही सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाजासह स्वच्छतेचे कामही ठप्प झाले. पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा व अग्निशमन विभाग वगळता इतर विभागांचे तब्बल 1 हजार 337 कर्मचारी संपात सहभागी झाले. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेत संपात सहभागी झालेल्या सर्वांची बिनपगारी करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत.
महापालिका कामगार संघटनेने 5 सप्टेंबरला महापालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक सत्याग्रहाची पूर्वसूचना प्रशासनाला दिली होती. त्यानुसार मंगळवारी प्रवेशद्वारासमोर काहीकाळ सत्याग्रह, धरणे आंदोलन होईल,अशी अपेक्षा होती. मात्र, अचानक कामगार संघटनेने सत्याग्रहाऐवजी संप करत कामकाज बंद ठेवले. कर्मचारी व सफाई कामगारांनीही त्यात सहभागी होऊन सफाईचे काम बंद ठेवले. यामुळे विविध कामानिमित्त मनपात आलेल्या नगरकरांचे हाल झाले. आस्थापना विभागाने संपात सहभागी झालेल्या कर्मचारी-कामगारांची माहिती संकलित केली. यात अत्यावश्यक सेवेतील 263 कर्मचारी हजर होते. तर 1337 कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले. या सर्वांची बिनपगारी रजा नोंदवण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरीचे लाभ मिळण्यासाठी कायदेशीर कारवाई करावी, कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा अदा कराव्यात, पदोन्नती न देता एकतर्फी सुरू केलेली कर्मचारी भरती थांबवावी, अशा विविध मागण्यांसाठी मनपा कामगार संघटनेने लाक्षणिक सत्याग्रहाची नोटीस मनपाला दिली होती. तसेच 2 ऑक्टोबरपासून मंत्रालयावर लॉंग मार्च काढण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
शहरात कचऱ्याचे ढीग; घंटागाड्या सुरू
महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही संपत सहभागी होत काम बंद ठेवल्याने शहरातील स्वच्छतेचे कामकाज ठप्प होते. मध्य शहरासह उपनगर परिसरात साफसफाई न झाल्याने रस्त्यावर व मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था महापालिकेकडून झाली नाही. दरम्यान, खाजगी संस्थेमार्फत सुरू असलेले घरोघरी कचरा संकलनाचे काम मात्र नियमितपणे सुरू होते.