मुंबई हादरली! पवईत 20 शाळकरी मुलांना ठेवले ओलीस; आरोपीच्या मागण्या काय? थरारक सुटका…

मुंबई : राजधानी मुंबईत गुरुवारी मोठी खळबळ उडाली. पवई परिसरामध्ये एका व्यक्तीने तब्बल २० हून अधिक शाळकरी मुलांना ओलीस (Hostage) ठेवल्याची थरारक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस, एनएसजी कमांडो आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. हायव्होल्टेज नाट्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
ऑडिशनच्या ठिकाणी घडला प्रकार –
मिळालेल्या माहितीनुसार, पवईच्या ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तेथे गेल्या पाच दिवसांपासून एका शूटिंगसाठी लहान मुलांच्या ऑडिशनचे (Audition) काम सुरू होते. याच ठिकाणी जमलेल्या १५ वर्षांखालील २० ते २२ मुला-मुलींना आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) याने ओलीस ठेवले. मुलांना बंदी बनवल्यानंतर आरोपीने व्हिडिओद्वारे माहिती देऊन एकच खळबळ उडवून दिली.
‘मी दहशतवादी नाही, मला संवाद साधायचा आहे’ –
आरोपी रोहित आर्य याने व्हिडिओमध्ये आपल्या मागण्या स्पष्ट केल्या. ‘मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना बंदी बनवलं आहे,’ असे त्याने नमूद केले. ‘मी दहशतवादी नाही, माझी पैशाची मागणी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला फक्त काही लोकांशी संवाद साधायचा आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत,’ असे त्याने स्पष्ट केले.
आरोपीने सांगितले की, ‘हा प्रश्न केवळ माझा एकट्याचा नाही, तर अनेक लोकांना हा प्रश्न भेडसावत आहे. त्याच्या तोडग्यासाठी (Solution) मला संवाद साधायचा आहे.’ त्याने आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास ‘तीव्र उपोषण’ करण्याची धमकीही दिली. ‘मी आता पाणीही घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम,’ असे त्याने धमकावले होते.
पोलिसांची यशस्वी कामगिरी; मुलांची सुटका –
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पवई परिसरात तातडीने पोलीस आणि विशेष पथके तैनात करण्यात आली. मुंबई पोलीस दलासोबत एनएसजी कमांडो पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे मोहीम राबवली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कारवाईनंतर अखेर ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सर्व २० हून अधिक मुलांना सुखरूप सोडवले असून, पालकांनी सुटकेचा श्वास घेतला. या घटनेमुळे मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.





