Varsha Gaikwad : मुंबईतील पायाभूत सुविधांच्या ऱ्हासाला भाजप जबाबदार; वर्षा गायकवाड यांचा आरोप
मुंबई शहराच्या खालावलेल्या नागरी पायाभूत सुविधांसाठी भाजप जबाबदार आहे. जवळपास तीन दशके बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) प्रभावी नियंत्रण असूनही भाजप आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी रविवारी केला.

Varsha Gaikwad : मुंबई शहराच्या खालावलेल्या नागरी पायाभूत सुविधांसाठी भाजप जबाबदार आहे. जवळपास तीन दशके बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (बीएमसी) प्रभावी नियंत्रण असूनही भाजप आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी रविवारी केला. गायकवाड यांनी म्हटले की, भाजप गेल्या ३० वर्षांपासून बीएमसीत सत्तेत आहे.
नागरी प्रशासनावर भाजपचेच नियंत्रण कायम आहे. त्यामुळे शहराच्या सध्याच्या स्थितीपासून ते स्वतःला वेगळे ठेवू शकत नाहीत. स्वतःची तिजोरी भरताना भाजपने मुंबईची लूट केली आहे. शहराच्या या ऱ्हासाची जबाबदारी ते नाकारू शकत नाहीत.
पावसाळ्याशी संबंधित इतर खर्चाव्यतिरिक्त बीएमसी दरवर्षी गटारांमधील गाळ काढण्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करते, तरीही पावसाच्या केवळ एक-दोन सरींनीच शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.
पावसाळ्याच्या तयारीबाबत १०० टक्के पूर्णता झाल्याचे दावे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाकडून (Varsha Gaikwad) वारंवार केले जात असूनही मोठी झाडे पडून जीवित व वित्तहानी होणे, रस्ते खचणे, निवासी सोसायट्यांमध्ये पाणी शिरणे आणि वाहतूक ठप्प होणे यांसारख्या घटना घडत आहेत.
महापौर रील्स बनवण्यातच अधिक मग्न असल्याचे दिसत होते, तर महापालिका आयुक्त कोणतीही उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत, असे त्या म्हणाल्या. शहरातील दुर्दैवी घटनांकडे भाजप हलक्याफुलक्या दृष्टीने पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्ताधारी पक्षाच्या अपयशावर प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहे. दिल्लीपासून स्थानिक पातळीपर्यंत सत्तेत असूनही आणि विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही भाजपने नक्की काय साध्य केले? असा सवाल त्यांनी केला. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडवण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम आणि बांगलादेशींशी संबंधित मुद्दे उपस्थित करून समाजात फूट पाडण्यातच भाजपला अधिक रस आहे, असा दावा त्यांनी केला.
…मग टोल वसुली का थांबवली नाही?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३ किमी लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पावरूनही गायकवाड यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर टीका केली. पावसाळा सुरू झाल्यानंतर या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा संदर्भ देत, हा रस्ता चाचणीच्या (टेस्टिंग) टप्प्यावर आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशी कोणती चाचणी आहे ज्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो? जर या द्रुतगती मार्गाची अजूनही चाचणीच सुरू असेल, तर टोल वसुली का थांबवण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी (Varsha Gaikwad) केला.






