पौड, (वार्ताहर) – मुळशी तहसील कार्यालयाचे आवार खासगी वाहनांसाठी वाहनतळ बनल्याचे काही दिवसांपासनू दिसत आहे. यावर तहसीदार रणजीत भाससले यांनी अॅक्शन घेत नियमातील गाड्या वगळता इतर सर्व गाड्या स्वतः थांबून बाहेर काढल्या. यामुळे कर्मचार्यांची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली.
मुळशी तहसील कार्यालय आवारात लावण्यात आलेल्या महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिकांनी बिनधास्तपणे लावण्यात आलेली खासगी वाहने लावू नयेत. याबाबत तहसील कार्यालयात येताना नो पार्किंग बॉर्ड आणि कार्यालय आवारात तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सदस्य यांच्या वाहनाशिवाय अन्य कोणतेही वाहन परवानगी शिवाय आत सोडण्यात येणार नाही असा फलक लावण्यात आलेला आहे.
तरीसुद्धा बिनधास्तपणे रोज वाहने लावण्यात येत होती. आज मंगळवार असल्याने नागरिकांना भेटण्याचा तहसीलदार यांचा दिवस. त्यामुळे नागरिकांची गर्दी होती. तहसील आवारात वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास व उभे राहण्यास अडथळा निर्माण होत होता.
हे आज प्रत्यक्ष तहसिलदार रणजित भोसले यांनी पाहिले असता तात्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना आपली वाहने काढण्यास सांगितले. यापुढे तहसील कार्यालय आवारात वाहने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाहने हटवल्याने तहसील कार्यालय आवाराने मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले.
दबंगगिरीची चर्चा
तहसीलदार रणजित भोसले यांनी अचानक आवारात लावण्यात आलेली खासगी वाहने काढण्यास सांगितल्याने महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या खाजगी वाहने आवारातून हटवण्यासाठी धावपळ झाली. लगेच सर्वांनी आपली वाहने कार्यालया बाहेर लावली हे सर्व नागरिकांसमक्ष झाल्याने तहसीलदार यांच्या कामाचे कौतुकाची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. तहसील कार्यालयाच्या आवारात यापुढे शासकीय वाहनांव्यतिरिक्त खाजगी वाहने लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. -रणजित भोसले, तहसीलदार मुळशी