Dial 112 Misuse: ‘डायल ११२’ वर पोलिसांना फोन करणे महागात? जळगावच्या तरुणाने दारूच्या नशेत काय केले पाहा
Dial 112 Misuse: पहाटेच्या सुमारास बस चालकाविरोधात केली होती तक्रार; पोलिसांनी शोध घेतला असता तरुण दारूच्या नशेत आढळला, वैद्यकीय अहवालात खुलासा.

Dial 112 Misuse – आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली ‘डायल ११२‘ ही सेवा अनेकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. मात्र काही व्यक्तींकडून या सेवेचा गैरवापर होत असल्याची बाब समोर येत असून, अशा प्रकारांमुळे खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होण्याचा धोका निर्माण होत आहे. आळेफाटा येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने पोलिसांना खोटी माहिती देत शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल प्रकाश पाटील (वय ३५, रा. चहार्डी, जि. जळगाव) याने पहाटेच्या सुमारास ‘डायल ११२’वर फोन करून खासगी बसचालकाकडून मारहाण होत असल्याची तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत गस्ती पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र संबंधित ठिकाणी कोणीही आढळून आले नाही. त्यानंतरही त्याने पुन्हा पोलिसांना फोन करून चुकीची माहिती दिली.
संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो आळेफाटा बसस्थानक परिसरात आढळला. यावेळी त्याने पोलिसांशी वाद घालत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.डॉ क्टरांनी दिलेल्या अहवालात त्याने मद्याचे अतिसेवन केल्याचे स्पष्ट झाले.
दारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणे, शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचा नागरिकांसाठी संदेश
‘डायल ११२’ ही सेवा अपघात, गुन्हे, महिलांची सुरक्षा, वैद्यकीय मदत आणि इतर आपत्कालीन प्रसंगांसाठी सुरू करण्यात आली आहे. खोट्या तक्रारींमुळे पोलीस यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ विनाकारण खर्ची पडते. त्याचवेळी एखाद्या खऱ्या संकटात अडकलेल्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. म्हणूनच आपत्कालीन सेवांचा वापर जबाबदारीने करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. मदतीसाठी केलेला एक खोटा फोन केवळ कायदेशीर कारवाईलाच कारणीभूत ठरत नाही, तर एखाद्याच्या जीविताशीही खेळ करू शकतो, हा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.




