Marriage Fraud: लुटेरी दुल्हन! २४ तासात फाटला फसव्या लग्नाचा बुरखा; आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई
Marriage Fraud: विवाह झाल्यानंतर अवघ्या २४ तासात नवरी पसार होण्याच्या तयारीत; आळेफाटा पोलिसांकडून नवरीसह चौघांवर गुन्हा दाखल.

Marriage Fraud – विवाह झाल्यानंतर अवघ्या २४ तासात नवरी घरातून पसार होण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या करणी नवरीसह चौघांविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकरूखे (ता. राहता, जि. अहिल्यानगर) येथील अजय भीमराज रोहोम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात संगीता शिंदे (आळे),
अमोल पिंजारी (श्रीरामपूर), सोनाली भोसले (परतूर, जालना), राधा रमेश काळे (जालना) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मध्यस्थांमार्फत संपर्क झाल्यानंतर अजय यांना राधा काळे हिचे स्थळ दाखविण्यात आले. विवाहासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. २० जून रोजी आळे येथे विवाह पार पडला आणि त्यासाठी संबंधित एजंटकडे १ लाख ६० हजार रुपये देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी कोपरगाव येथे विवाहाचे उर्वरित विधी पार पडले.
नववधूला घरी आणल्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र होते. मात्र सायंकाळी घरासमोर काळ्या काचा असलेली पांढरी कार येऊन थांबल्याने घडामोडींना वेगळे वळण मिळाले. कार दिसताच नवरी घाईघाईने तिच्याकडे जाऊ लागल्याने कुटुंबीयांना संशय आला. यानंतर झालेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. लग्नानंतर ठरलेल्या योजनेनुसार घरातून निघून जाण्याचा आणि व्यवहारातून मिळालेल्या पैशांमधील हिस्सा घेण्याचा कट रचल्याचे उघड झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या घटनेमुळे विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या नव्या पद्धतीबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः विवाहासाठी मध्यस्थांवर अवलंबून राहणाऱ्या कुटुंबांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत.

