– माधव विद्वांस
दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्ध यशस्वी लढा देणारे नेल्सन मंडेला यांचा आज जन्मदिवस. नेल्सन रोलिहला मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सकेई येथे झाला. त्यांचे वडील हेन्री मंडेला हे टेंटू जमातीचे प्रमुख होते. मंडेला यांनी फोर्ट हेरे आणि विटवॉटरस्रॅंड विद्यापीठात शिक्षण घेतले आणि 1942 मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया सरकार म्हणजे मानवी संस्कृतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता.
त्याचे चटके लहानपणापासूनच त्यांनी अनुभवले होते. विशेष म्हणजे ब्रिटिश वंशाचे लोक अल्पसंख्य असूनही त्यांच्याकडे अनिर्बंध सत्ता होती. प्रिटोरिया सरकारच्या शासनात वयाच्या सोळाव्या वर्षांनंतर नेहमीच काळे प्रमाणपत्र असणे बंधनकारक होते. मंडेला जन्मास येण्यापूर्वी गांधीजींनी आपल्या अहिंसात्मक आंदोलनाला दिशा दिली होती.त्यामुळे अर्थातच गांधीजी हे मंडेलांचे आदर्श झाले होते. ते वर्ष 1893 ते 1914 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेमध्ये होते.
वर्ष 1944 मध्ये मंडेला आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर 1952 मध्ये ते ट्रान्सवाल शाखेचे अध्यक्ष झाले. नंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. वर्ष 1953 मध्ये त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर त्यांच्या सरकारविरोधी हालचालींमुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि 1956 मध्ये त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 5 ऑगस्ट 1962 रोजी त्यांना पुन्हा देशव्यापी संप घडविल्याबद्दल, देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यानंतर ते 27 वर्षे तुरुंगात राहिले. त्यामुळे मंडेला जगभर प्रसिद्ध झाले आणि संपूर्ण आफ्रिका खंडातील वर्णभेदविरोधी लढ्यातील ते सर्वात प्रमुख नेते बनले. मंडेला यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना जोहान्सबर्ग बाहेर पाठवण्यात आले होते.
परिस्थितीनुसार भूमिगत होऊन मंडेला केपटाउनला गेले आणि तेथील कॉंग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहू लागले. कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व संघटनांसोबत त्यांनी तेथे काम केले. सरकारच्या दडपशाहीमुळे मंडेला यांच्यामागे जनता येऊ लागली. आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत होते. याचवेळी कृष्णवर्णीयांच्या हिताचे नसलेले काही कायदे संमत करण्यात आले. नेल्सन यांनी या कायद्यांना विरोध केला. या आंदोलनादरम्यान शार्पव्हिल शहरात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यात सुमारे 180 लोकांचा मृत्यू झाला होता.
शासनाच्या या क्रूरतेमुळे राष्ट्रीय संघटनेने सशस्त्र लढण्याचा निर्णय घेतला. या संघटनेला “स्पायर ऑफ द नेशन’ असे नाव देण्यात आले आणि मंडेला त्याचे प्रमुख झाले. सरकारला मंडेला यांना अटक करायची होती. हे टाळण्यासाठी मंडेला देशाबाहेर गेले आणि “आदिस अबाबा’ येथून आपल्या मूलभूत हक्कांची मागणी करू लागले. अखेर सातत्याने संघर्ष केल्याचे फळ त्यांना मिळाले. सत्ता नियंत्रणाच्या बाहेर जात आहे हे लक्षात घेऊन सत्तारूढ गोऱ्या सरकारने मंडेला यांच्या पक्षाबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. अखेर मंडेला 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष झाले. 5 डिसेंबर 2013 रोजी त्यांचे निधन झाले.