– माधव विद्वांस
वायरलेस टेलिग्राफीचे शोधक गुल्येल्मो मार्कोनी यांचा आज जन्मदिन. आज जगामधे संदेशवहनाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यात सातत्याने सुधारणा होत असली तरी याचा पाया मात्र मार्कोनी यांनीच घातला. त्यांचा जन्म इटलीमधील बोलोग्ना या गावात 25 एप्रिल 1874 रोजी झाला. त्यांच्या पालकांनी नेमलेल्या खासगी शिक्षकांकडूनच ते रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र घरीच शिकले. त्यानंतर ते लेगहॉर्न येथील तांत्रिक शाळेत शिक्षणासाठी गेले. विद्यार्थीदशेतच त्यांना भौतिकीय व विद्युतशास्त्रांची गोडी लागली. वर्ष 1894 मध्ये त्यांनी बोलोग्ना येथेच बिनतारी संदेशवहनासंबंधी प्रयोग करण्यास प्रारंभ केला.
त्याकरिता त्यांनी वापरलेली (भंगार) विद्युत उपकरणे वापरून प्रयोग सुरू केले. प्रथम त्यांनी रेडिओ तरंग अस्तित्व ओळखण्यासाठी संवाहक चूर्णयुक्त नलिका वापरून प्राथमिक प्रयोग केले. अल्प अंतरासाठी प्राथमिक प्रयोग केल्यानंतर त्यांनी अस्तित्व दाखवणाऱ्या नलिकेत सुधारणा केली आणि मग एका खांबावर वरच्या टोकाला एक धातूची पट्टी वा दंडगोल व त्याला तारेने जोडलेली तशाच प्रकारची पट्टी खांबाच्या तळाला बसवून तयार होणाऱ्या उभ्या एरियलचा उपयोग केल्याने संदेशवहनाचा पल्ला वाढतो, असे त्यांनी चाचण्या घेऊन सिद्ध केले. या प्रकारे संदेशवहनाचा पल्ला सुमारे 25 किमी इतका वाढविण्यात त्यांना यश मिळाले. त्यांना इटलीमधे आपले प्रयोग पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन मिळाले नाही म्हणून ते 1896 मध्ये इंग्लंडला गेले.
ब्रिटनचे टपाल खात्याचे मुख्य अभियंते विल्यम प्रीस यांच्याशी मार्कोनी यांची ओळख झाली आणि त्याच वर्षी जून महिन्यात त्यांनी बिनतारी तारायंत्रविद्येच्या एका प्रणालीचे जगातील पहिले पेटंट मिळविले. त्यांनी उंची मिळविण्यासाठी बलून्सचा व पतंगांचा उपयोग केला. सॉल्झबरी मैदानावर सुमारे 65 किमी व ब्रिस्टल खाडीपार सुमारे 145 किमी अंतरावर संदेश पाठविण्यात त्यांना यश मिळाले. मार्कोनींच्या चाचण्या व त्यावरील प्रीस यांची व्याख्याने यांना खूप प्रसिद्धी मिळाली. जून 1897 मध्ये मार्कोनी यांनी इटालियन सरकारला ला स्पेत्स्या येथे जमिनीवर प्रेषण स्थानक उभारून सुमारे 19 किमी अंतरावरील इटालियन युद्धनौकांना बिनतारी संदेश पाठविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सुरुवातीस संदेशवहन पद्धतीच्या व्यावहारिक उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे त्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी कोणी पुढे येईना. मात्र, मार्कोनी यांचे मावसबंधू व अभियंते जेम्सन डेव्हिस यांनी त्यांना भांडवल पुरविले आणि त्यांच्या मदतीने वायरलेस टेलिग्राफ अँड सिग्नल कंपनी लि. जुलै 1897 मध्ये स्थापन झाली. मार्कोनी यांचे अधिक अंतराचे प्रयोग सुरूच होते. डिसेंबर 1901 पर्यंत संदेश अटलांटिक महासागर पार करून न्यू फाउंडलंडनमधील सेंट जॉन्स येथे मिळविण्यात यश प्राप्त केले.
पहिल्या महायुद्धात 1914 मध्ये ते इटालियन सेनेत लेफ्टनंट झाले. पुढे त्यांना कॅप्टन म्हणून बढती मिळाली आणि 1916 मध्ये नाविक दलाचे कमांडर झाले. मार्कोनी यांना नोबेल पारितोषिकासह अनेक बहुमान मिळाले. वर्ष 1929 मध्ये त्यांची इटलीच्या सिनेटवर नियुक्ती झाली. 20 जुलै 1937 रोजी त्यांचे रोम येथे त्यांचे निधन झाले.