पिंपरी – शहरातील न्यायालये नेहरूनगर येथील जागेत स्थलांतरित करण्याचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनकडून पाठपुरावा सुरू आहे.
पिंपरी न्यायालयातील न्यायाधीशांनी या कामाची नुकतीच पाहणी केली आहे. पुणे जिल्हा न्यायाधीशांकडून येथील कामाची पाहणी करण्यात येणार आहे, असे ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे यांनी शनिवारी (दि. 13) स्पष्ट केले.
ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा “दैनिक प्रभात’च्या वतीने शनिवारी पिंपरी येथील विभागीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी “डिजिटल प्रभात’ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.
“दैनिक प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. “दैनिक प्रभात’चे व्ययस्थापक सीए रवी इंडी, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी यांच्यासह ऍडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गौरव वाळुंज, सचिव ऍड. निखिल बोडके, महिला सचिव ऍड. प्रियंका सुरवसे, सहसचिव ऍड. सुनील रानवडे, खजिनदार ऍड. अनिल पवार, हिशेब तपासणीस ऍड. गोरख मकासरे, सदस्य ऍड. मंगेश खराबे, ऍड. महेश मासुळकर, ऍड. सारिका मोरे, ऍड. संतोषी काळभोर, ऍड. स्नेहा कांबळे, ऍड. ऐश्वर्या शिरसाट तसेच ऍड. राजेश रणपिसे, ऍड. प्रमोद रावळ, ऍड. शिवम कुंभार आदी उपस्थित होते.
मोशीतील न्यायसंकुलासाठी सुधारित आराखडा
मोशी येथील न्यायसंकुल इमारतीसाठी जागा मंजूर झालेली आहे. मात्र, अद्याप न्यायसंकुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. हे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. येथील इमारत बांधकामाचा सुधारित आराखडा करून घ्यायचा आहे, असे ऍड. थोपटे यांनी स्पष्ट केले.