मेक्सिकोमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य मेक्सिकोच्या एका भागात ड्रग्ज तस्करांनी केलेल्या गोळीबारात 8 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये एक वर्षाची मुलगी आणि एका 16 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
मेक्सिकोच्या प्रादेशिक अभियोक्ता कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री उशिरा गुआनाजुआटो राज्याच्या सिलाओ नगरपालिका क्षेत्रातील दोन मोटारसायकलवरून आलेल्या बंदुकधारींनी घरांवर गोळीबार केला. या घटनेत दोन मुलांसह 8 जणांना जीव गमवावा लागला.
राज्याचे गृहसचिव लिबिया गार्सिया यांनी ट्विट केले की, सालिओमध्ये घडलेल्या प्रकारामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पळून जाण्याची किंचितही संधी देणार नाही. पीडितांना लवकरच न्याय मिळेल.
दरम्यान, मेक्सिकोमध्ये अनेक टोळ्या अंमली पदार्थांची तस्करी आणि चोरीच्या इंधन बाजारावर वर्चस्वासाठी लढत आहेत. नोव्हेंबरमध्ये सिलाओमध्ये अशाच दोन हल्ल्यांमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला होता. अधिकृत आकडेवारीनुसार जेव्हा सरकारने एक विवादास्पद अंमली पदार्थ विरोधी लष्करी मोहीम सुरू केली होती तेव्हा 2006 पासून मेक्सिकोमध्ये 300,000 हून अधिक खून झाल्याची नोंद झाली आहे.