Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणारे आत्महत्येचे सत्र अद्याप थांबले नाही. मंगळवारी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर व संगमनेर येथील 2 तरुणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा थांबवली. यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, संगमनेर तालुक्यातील झोळे येथील सागर भाऊसाहेब वाळे नामक 25 वर्षीय तरुणाने मंगळवारी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. या तरुणाने आपल्या घरामागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उजेडात आली. सागरच्या मृतदेहाशेजारी एक वही आढळली आहे. त्यात एक मराठा लाख मराठा असा उल्लेख करत आरक्षणाच्या मुद्यावर आपली भावना व्यक्त केली आहे.
“आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये. आपला लाडका सागर मराठा,’ असा उल्लेख सागरने आपल्या चिठ्ठीत केला आहे.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी मृत्युला कवटाळले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पोखरी गावातील शुभम अशोक गाडेकर असे या तरुणाचे नाव आहे.
त्याने पोखरी शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शुभम गाडकेर हा एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ व आई-वडील आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.