Manoj Jarange – अजय बारसकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
सरकारने अजय बारसकर यांचे बलात्काराचे प्रकरण दाबले असून, त्यांना शिंदे-फडणवीसांच्या नेत्यांची फूस आहे, असे विधानही जरांगे यांनी केले आहे. बारसकर महाराज वगैरे नाही. त्यांच्या गावातील लोक बारसकरने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात.
अशाच एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात बारसकर अडकले होते. ते प्रकरण सरकारकडून दाबले गेले. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझे प्रकरण उघड करु, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा जरांगेंनी केला आहे.
बारसकर बच्चू कडूंसोबत यायचे. ज्या माणसाला सोशल मीडियावरही काडीची किंमत नाही त्यांच्यासोबत आज मुंबईतील चॅनल्स तास-तासभर बोलत आहेत. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य आहे का?”, असा सवालही जरांगेंनी विचारला.
तसेच, मी १९ वर्षे संघर्ष करत आहे, मला कधी चॅनल्स मिळाली नाहीत आणि त्यांना तास-तासभर चॅनेल्सवर बोलायला मिळते. सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारसकर यांच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्यालाही मी सांगतोय, तुम्ही याला साथ दिली तर याच्यामुळे तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशाराही त्यांनी दिला.