पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे मालदीवच्या मंत्र्यांना महागात पडले आहे. मालदीव सरकारने आपल्या मंत्री मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. याशिवाय मलशा आणि हसन जिहान या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त विधाने करणाऱ्या दोन्ही मंत्री आणि एका खासदाराला तत्काळ प्रभावाने त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनीही खडसावले –
याप्रकरणी मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनीही मंत्री आणि खासदारांवर टीका केली होती. ते म्हणाले की, सोशल मीडियावर मालदीव सरकारच्या मंत्र्यांकडून भारताविरोधात वापरण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा कठोर टिप्पण्यांमुळे आमच्या दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही.
माजी उपराष्ट्रपती म्हणाले – अशी विधाने अमान्य
मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांनीही भारताला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे, जी घडायला नको होती. जेव्हा तुम्ही निवडून आलेले पद सांभाळता तेव्हा तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. एखाद्याला अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे. जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या या अपमानास्पद टिप्पण्या मान्य नाहीत. सहिष्णुता, सौहार्द, मैत्री आणि आदरातिथ्य यावर आम्ही आमचे पर्यटन उभारतो. या मंत्र्यांच्या टिपण्ण्या कोणत्याही स्तरावर मान्य नाही.
भारताने व्यक्त केली होती नाराजी –
मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर भारताने नाराजी व्यक्त करत मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला होता. यानंतर मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. समुद्रकिनाऱ्यावरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर शेजारील देश मालदीवमध्ये गदारोळ झाला आणि तेथील एका मंत्र्याने पीएम मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींच्या फोटोंवर टिप्पणी करताना त्यांना ‘विदुषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ म्हटले होते.