T20 World Cup 2024 (warm-up match) : टीम इंडिया आज बांगलादेशशी भिडणार ..! जाणून घ्या, सामन्याचे Live-streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

T20 World Cup 2024 (INDvs BAN warm-up match Highlights) : टी- 20 विश्वचषक 2024 हा 2 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी काही संघ सराव सामने खेळणार आहेत. अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 27 मे ते 1 जून या कालावधीत सराव सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 1 जून (शनिवार) रोजी न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. मुख्य सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया नझमुल हसन शांतोच्या संघाविरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळताना दिसणार आहे.
बांगलादेशचा पहिला सराव सामना अमेरिकेविरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. या स्पर्धेपूर्वी बांगलादेशचा अमेरिकेकडून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव झाला होता. मागील आकडेवारी पाहता भारतीय संघाचा बांगलादेशवर वरचष्मा असून आतापर्यंत दोन्ही संघांमधील 13 पैकी 12 सामने भारताने जिंकले आहेत.
पाकिस्तानचा एकही सराव सामना नाही
पाकिस्तान संघ 6 जून रोजी अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर बाबर आझमचा संघ 9 जूनला भारताशी भिडणार आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत कोणताही सराव सामना खेळणार नाही. सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची टी-20 मालिका खेळताना दिसत आहे. याआधी बाबरच्या सेनेने आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. पाकिस्तानशिवाय दक्षिण आफ्रिकाही सराव सामना खेळणार नाही.
सराव सामना कुठे बघायला मिळणार?
टी 20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. त्याच वेळी, या सामन्यांचे फोन किंवा लॅपटॉपवर लाइव्ह-स्ट्रीमिंग हे डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया आणि भारत-बांगलादेश या दोनच सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान





