पिंपरी – कर्जदार महिलेचे अश्लील फोटो बनवले. ते फोटो महिलेच्या नातेवाइकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून दिले. हा प्रकार 22 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2022 या कालावधीत बावधन येथे घडला. पीडित महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9893603219, 7568025277, 7305476983 या क्रमांकावरील व्यक्ती आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला घरी असताना त्यांनी स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशन मधून कर्ज घेतले होते. त्यानंतर ते कर्ज त्यांनी व्याजासहित परत केले. त्यांनतर स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशनचे मोबाईल नंबर 9893603219, 7568025277, 7305476983 यावरील इसम तसेच महिला यांनी फिर्यादी यांच्या चेहऱ्याचा वापर करून त्यांचा अश्लील फोटो तयार केला.
तो त्यांच्या मोबाइल नंबरवर पाठवून त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवला. तसेच फिर्यादी यांच्या इतर डाक्युमेंट्सचा वापर करून आरोपींनी फिर्यादी यांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाइकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला.