Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा ( Mahua Moitra ) यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचे आरोप करण्यात आले होते. याच आरोपासंदर्भात संसदेच्या एथिक्स कमिटीचा अहवाल अखेर आज लोकसभेत सादर करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
एथिक्स कमिटीने अहवाल सादर केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
त्यानंतर संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा आज (दि. ८) केली. ‘मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करत आहे. त्यामुळे त्यांचे खासदार म्हणून राहणे योग्य नाही’, अशी टिप्पणी बिर्ला यांनी केली.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला नेमकं काय म्हणाले..
“नीतिमत्ता समितीने अहवालात सुचविलेल्या शिफारशी सभागृहाने स्वीकारल्या आहेत. खासदार म्हणून महुआ मोईत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि असभ्य होते. त्यामुळे त्यांना खासदार या पदावर ठेवता येणार नाही.” विशेष म्हणजे समितीचा अहवाल पटलावर मांडल्यानंतर काही तासांतच लोकसभा सभागृहाने महुआ मोईत्रा यांना निलंबित केले आहे.
खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा काय म्हणाल्या…
खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, “मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता’.