नवी दिल्ली – डॉक्टर, इंजिनिअर असल्याची बतावणी करून अनेक महिलांशी विवाह करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याने 15 जणींशी विवाह केला आहे. तर काही जणींना विवाहाचे आमिष दाखवून लुबाडले आहे. त्याला या महिलांपासून 4 अपत्येही झाली आहेत. तो आणखीन काही महिलांना फसवण्याच्या पूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक होण्यासाठी त्याचे इंग्रजी अत्यंत कमकुवत असणे कारणीभूत ठरले आहे. म्हैसूर पोलिसांनी रविवारी त्याला अटक केली आहे.
महेश के. बी. नायक असे या भामट्याचे नाव असून तो बेंगळूरूतील बानाशंकरी भागातील रहिवासी आहे. 35 वर्षांच्या नायकने 2014 पासून आतापर्यंतर 15 जणींना फसवले आहे. या महिलांकडील दागिने आणि रोख रक्कम घेऊन त्याने पोबारा केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला महेश नायकने म्हैसूरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेशीही अशाच प्रकारे खोटे बोलून विवाह केला होता. तिने महेशविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तर त्याच सुमारास फसवणूक झाल्याने आणखीन एक महिला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आली असता महेश नायकचे बिंग फुटले. म्हैसूर पोलिसांनी एक पथक करून महेशचा शोध घेतला आणि तुमाकुरू येथून त्याला ताब्यात घेतले.
महेश नायकने महिलांशी संपर्क साधण्यासाठी मॅट्रिमोनियल वेबसाइटवर बनावट प्रोफाइल तयार केला होते. त्यात तो डॉक्टर आणि इंजिनिअर असल्याची बतावणी करत असायचा. डॉक्टर असल्याचे भासवण्यासाठी त्याने तुमाकुरूमध्ये दवाखानाही सुरू केला होता. सहायक म्हणून एक नर्स देखील नोकरीला ठेवली होती. मात्र तो अत्यंत सुमार इंग्रजी बोलत असल्यामुळे अनेक महिलांना त्याचा संशय येऊ लागला होता. त्यातूनच त्याचे पितळ उघडे पडले, असे पोलिसांनी सांगितले.