पुणे – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तिजोरीच्या चाव्या आहेत. हे दोघे मिळून कॉंग्रेसला निधी देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे कॉंग्रेसची फरफट होत असून, त्यांनी वेळीच सावध व्हावे. दोन्ही पक्षाच्या मागे फरफटत जावू नये, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कॉंग्रेसला दिला.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत (पॅकेज) दिली जाते. कॉंग्रेसकडे ऊर्जाखाते असून, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, अशी घोषणा केली होती. त्यासाठी सरकारकडे पॅकेजची मागणी केली.
मात्र, तो प्रस्ताव धुडकावला. त्यामुळे शिनसेना व राष्ट्रवादीचे मंत्री हे जाणून-बुजुन कॉंग्रेस मंत्र्यांना लोकांपुढे कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका होत नाहीत. समन्वयाचा अभाव असून, त्याचे परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहेत.
हे सरकार संकटकाळात वीजबिल माफ करण्यापेक्षा ते भरावेच लागेल, असे परिपत्रक काढले. तसेच ते का गरजेचे आहे यासाठी ग्राहकमेळावे घेण्याचे नियोजन असून, आम्ही ते होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे.