मुंबई – बिग बॉस फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. मीराने मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून मीरा घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील तिची हटके भूमिका विशेष चर्चेत आली होती. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
सध्या मीरा लंडनमध्ये आहे. मात्र तेथील एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाराष्ट्र सरकारची झलक पोस्टरद्वारे लंडनमध्ये पाहायला मिळाली आहे. याचीच एक झलक मीराने सोशल मीडियाद्वारे दाखवली आहे. लंडनमधील एक व्हिडिओ मीराने तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो पोस्टवर दिसत आहे.
सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्यावर वाघनखं असं लिहिलेलं दिसत आहे. मीराने हा व्हिडिओ शेअर करत “गर्व असलेला भारतीय”, असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, लंडनमध्ये असलेली शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी करार करण्यात आला आहे. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले होते. यानिमित्त लंडनमध्ये ठिकठिकाणी वाघनखांसंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “या वर्षात आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे.”दरम्यान, ही “वाघनखं’ नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहणार आहेत.