पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी (दि. 19 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असून ते पुणे महापालिकेत येणार आहेत. त्यांच्या हस्ते महापालिका भवनाच्या हिरवळीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
मात्र अमित शहा याचा दौरा त्याआधीच वादाचा विषय ठरत आहे. पुण्याच्या भाजपाशासित स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शहांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकांवर केवळ भाजपा नेत्यांचे मोठे फोटो लावल्यावरुनही विरोधकांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच नगरसेवकांनी मात्र शुक्रवारी आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. या पोस्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नाहीत, त्यामुळे त्यांचा अवमान झाल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला आहे.