डोंबिवली – इम्पिरिकल डाटा 98 टक्के बरोबर आहे, असे लोकसभेत निवेदन करणारे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र या डाटामध्ये अनेक त्रूटी असल्याचे सांगते. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका दूटप्पी आणि ओबीसींवरील अन्यायास कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होते, लोकसभेमध्ये इम्पिरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचे उत्तर केंद्र सरकारने दिले आहे, केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात सादर करताना, त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, असे सांगितले. केंद्र सरकारकडून भूलथापा दिल्या जात आहेत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान केले. ओबीसी समाजाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची वेळ आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आली आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही, मात्र मुद्दामहून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
महाराष्ट्रातच नाही तर, मध्य प्रदेशात देखील ओबीसींचे आरक्षण गेले आहे. कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याची टीका पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
परीक्षा पारदर्शी होण्यासाठी सरकारचा प्रयत्न
पेपर फुटी प्रकरणांनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘एमपीएससी’ला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही, म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला. एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते, मात्र काही एजन्सी ब्लॅकलिस्ट आहेत, काही एजन्सी याचा गैरफायदा घेणारे आहेत. फार कमी एजन्सी आहेत, ज्या सक्षमपणे परीक्षा देऊ शकतात. दोन दिवसांपूर्वी म्हाडाची परीक्षा होती. परीक्षेतील नियोजनाबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये. परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील म्हणाले.