भोपाळ – मध्यप्रदेशातील भाजपच्या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. त्याशिवाय, ज्येष्ठ नेते नरेंद्रसिंह तोमर यांचे विधानसभेच्या सभापतिपदाचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झाले आहे.
मध्यप्रदेशातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याशिवाय, इतर नेत्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली.
त्यानुसार, राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. तर, माजी केंद्रीय मंत्री तोमर सभापती म्हणून नव्या भूमिकेत दिसतील. त्याविषयीची माहिती मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिली. विधानसभा निवडणुकीआधी तोमर हे केंद्रीय कृषिमंत्री होते.
भाजपने ज्या खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले; त्यामध्ये तोमर यांच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव आले. आमदार बनल्याने त्यांनी खासदारकीबरोबरच केंद्रीय मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. तसे असले तरी सभापतिपद देऊन पक्षाने त्यांच्या अनुभवाला योग्य न्याय दिल्याचे मानले जात आहे.