वाघोली – लोणीकंद-केसनंद रोडवरील बाबा पेट्रोल पंपासमोर ट्रक आणि गॅस टँकरची धडक झाली. या अपघातात टँकरमधील गॅस गळती सुरू झाली होती. लोणीकंद पोलीसांनी व वाहतूक पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीसाठी रस्ता बंद केला. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून गॅस गळती बंद केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सकाळी आठ वाजता घडली होती. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गळती थांबवण्यात यश आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद-केसनंद रोडवरील बाबा पेट्रोल पंपावर ट्रक आणि गॅस टँकरची धडक झाली. या धडकेने गॅस टँकरमधील गॅसची गळती सुरू झाली. पोलीसांना कळताच त्यांनी तात्काळ दोन्ही कडील रस्ता बंद करून आजूबाजूच्या गावातील लोकांना अलर्ट केलं. गॅस ज्वलनशील असल्याने दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तात्काळ गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आलं. त्यांनीही घटनास्थळी धाव घेत उपाययोजना करून गळती थांबविली व तेथून टँकर हलविला. सुमारे तीन तास ही सर्व घटना सुरू होती. साडे अकरानंतर सर्व सुरळीत झाले.
पाच महिन्यापूर्वी याच लोणीकंद-केसनंद रोडवर मगरवस्तीजवळ गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यावेळीही अथक प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. त्याचाच अनुभव पुन्हा एकदा ग्रामस्थांना आला.