नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ( Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांची लगबग सुरू असून निवडणूक अयोगानेही या निवडणुकांची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांची आता अंतिम टप्प्यातील बोलणी सुरू असून येत्या १५ ते २० मार्चच्या दरम्यान निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त केंद्रीय गृहसचिवांशी आणि अन्य विभागांशी चर्चा करणार असून त्यानंतर ते जम्मू काश्मीरचा दौरा करणार असल्याचेही सांगण्यात आले. हा दौरा १२-१३ मार्चला होईल व त्यानंतरच निवडणुकीची घोषणा केली जाईल.
२०१९ मध्ये १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम १० मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान ७ टप्प्यांत मतदान झाले होते आणि २३ मे रोजी मतगणना झाली होती. विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ जून महिन्यात संपुष्टात येतो आहे. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाकडे गेल्या वेळेपेक्षा १५ दिवस अधिकचा कालावधी आहे. देशातील जून महिन्यातील हवामान पाहता निवडणुका तोपर्यंत लांबवल्या जाण्याची शक्यता कमी आहे.
काश्मीरमध्ये लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका –
जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक घेतली जावी की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. वास्तविक एकाच वेळी या निवडणुका घेतल्या जाणे सोईस्कर ठरणार आहे. मात्र सुरक्षा दलांची उपलब्धता हा यातील कळीचा मुद्दा असेल. या राज्यात निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमेदवाराला संरक्षण पुरवण्याची गरज भासते. असेही कलम ३७० रद्द केल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असेल.