कुसगाव बुद्रुक, दि. 13 (वार्ताहर) -येथील सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथील राष्ट्रीय सेवा योजना व कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कुसगाव लोणावळा येथील आदिवासी पाड्यात लाइटनिंग अरेस्टर (वीज सापळा) बसवण्यात आला आहे. त्यामुळे मनुष्य व पशू जीवितहानीची शक्यता तुलनेत कमी झाली आहे.
हा सापळा यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली वर्कशॉपमध्ये बनवला. त्यानंतर विद्युत शाखेचे विभाग प्रमुख डॉ. अमोल कळगे यांच्या मार्गदर्शनखाली त्याची गुणवत्ता पडताळणी केली 1.2 किमी त्रिज्येच्या क्षमतेचा हा सापळा हनुमान टेकडी, कुसगाव (बु) येथे वास्तव्यास असणाऱ्या दुर्गम पाड्यावरील आदिवासी बांधवांच्या संरक्षणासाठी बसविण्यात आला आहे. यानंतर वीजेपासून सुरक्षा या विषयावर स्वयंसेवकांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी कुसगाव ( बुद्रुक) च्या सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. भविष्यात अशाप्रकारचे वीज सापळे आवश्यक त्याठिकाणी बसविण्याचे मानस आहेत असे एन. एस. एस. चे अधिकारी प्रा. संतोष दबडे यांनी सांगितले.
काय आहे लाइटनिंग अरेस्टर
वळवाच्या पावसात विरुद्ध प्रभराचे ढग एकत्र येतात व त्यातून वीज तयार होते. या वातावरणीय प्रक्रियेमुळे विद्युत भार जमिनीवर कोसळतो, यास आपण वीज पडणे असे म्हणतो, ही घटना मानवी वस्तीनजीक घडल्यास बऱ्याचदा या नैसर्गिक आपत्तीमुळे मानव आणि पशू यांची हानी होते. यावर तोडगा म्हणून लोणावळा संकुल संचालक व प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस.चे स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे यांनी हा वीज सापळा बनवला आहे.