मुंबई – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र करण्यासाठी विरोधकांची दुसरी बैठक आज (दि. 18 जुलै) बेंगळुरू येथे पार पडली आहे. आज या बैठकीचा दुसरा दिवस असून, त्यात 26 विरोधी पक्षांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
आज या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. आजच्या या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून “एकत्र लढू आणि जिंकू..!’ असा निर्धार करण्यात आला.
यावेळी मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन इत्यादी अनेक बडे नेते उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांबरोबरचे फोटो शेअर करत सूचक ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात, आज बेंगळूरू येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो. यावेळी विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत भेटीगाठी झाल्या. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.