फुरसुंगी/कात्रज – दिवे घाट तसेच कात्रज घाट परिसरात गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून बिबट्याचा बछड्यांसह वावर आहे. पूर्व हवेलीतील वडकी गाव, फुरसुंगी गाव, रामदरा परिसर तसेच दक्षिणेकडील कात्रज, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी या परिसरात बिबटे दिसून येत आहेत. वनविभागाकडून पिंजरे लावण्यासारखे पर्याय करण्यात येत असले तरी बिबट्या गुंगारा देत आहे.
कात्रजच्या भिलारेवाडी पाझर तलावाच्या रस्त्याच्या बाजूला शनिवारी (दि.5) बिबट्याचे दोन बछडे निदर्शनास आले होते तर रविवारी (दि.6) फुरसुंगीलगतच्या कानिफनाथ डोंगर परिसरात स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर वनविभाग कर्मचाऱ्यांची मोठी पळापळ झाली. बिबट्याकडून मनुष्यवस्तीत हल्ले झालेले नसले तरी फुरसुंगी तसेच भिलारेवाडीतील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. बिबट्या नरभक्षक होण्यापूर्वी त्याला पकडून बिबट निवारण केंद्रात सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीत फुरसुंगी तसेच रामदरा परिसरात वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. परंतु, बिबट्या हाती लागलेला नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकरीता शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतरच्या तीन ते चार महिन्यांतील लॉकडाऊनच्या काळात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही बिबट्याला पकडण्याचा विषय सोडून दिला होता. परंतु, आता भिलारेवाडी तसेच कानिफनाथ डोंगर परिसरात बिबट्या बछड्यांसह दिसल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. वनविभाग कर्मचाऱ्यांनाही बिबट्या दिसल्याने त्याच्या पावलांचे ठसे घेणे त्यावरून त्याचा माग काढणे, असे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बिबट्या तीन ते चार किलोमीटर परिसरात फिरत असल्याचे दिसून येते.
सावज शोधण्यासाठी रात्रीच्यावेळी बिबट्या बाहेर पडत असुन ज्याठिकाणी जास्त वेळा बिबट्याचा वावर दिसून येतो, तेथे पिंजरा लावण्यात यणार आहे. यानुसार कात्रज घाट, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी तसेच फुरसुंगी परिसरातील सोनारपूल, सायकरवस्ती, मुळा-मुठा कालवा, चंदवाडी, हरपळेवस्ती आणि रामदरा परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन आहे. या परिसरात बिबट्याला लपण परिसर मुबलक आहे. त्यामुळे पिंजऱ्यातील सावजाकडे बिबट्या फिरकत नाही. यातून बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नसल्याचे निदर्शनास येत आहे.