मांडवगण फराटा – न्हावरे (ता. शिरूर) परिसरात सलग दोन दिवस बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन कुत्रे व पाच कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. न्हावरे येथील घाडगे वस्तीवर गुरुवारी (दि. 27) बिबट्याच्या हल्ल्यात दोन पाळीव कुत्री व पाच कोंबड्या ठार झाल्या आहेत. या परिसरात बिबट्याच्या दहशतीने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत संभाजी घाडगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांचा आवाजा उठल्याने गोठ्याकडे पाहिले असता बिबट्या जनावरांवर हल्ला करीत होता. दरम्यान घाडगे कुटुंबीयांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने घराशेजारीच असणाऱ्या उसात धूम ठोकली. या हल्ल्यात बिबट्याने दोन पाळीव कुत्री व पाच कोंबड्या ठार केल्या. शुक्रवारी येथील गारगोटे वस्तीवर बिबट्याने हल्ला केला.
यामध्ये अशोक गारगोटे यांचा पाळीव कुत्रा ठार झाला. दरम्यान, या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनाधिकारी विशाल चव्हाण यांनी भेट देऊन पंचनामा केला. न्हावरे परिसरात उसाचे क्षेत्र वाढल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा निर्माण झाली आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दररोज बिबटे आढळून येत आहेत. बिबट्याच्या या पाळीव जनावरांच्या हल्ल्याबाबत वाड्यावस्त्यांवरील शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.