Laxman Hake: ‘शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा;’ शाळा बंद अन् भरती घोटाळ्यांवरून प्रा. लक्ष्मण हाके आक्रमक!
Laxman Hake: फलटण येथील पत्रकार परिषदेत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाकेंचा इशारा; सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याची मागणी.

Laxman Hake – महाराष्ट्रातील सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत असून हजारो विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षक भरती रखडली असून भरती प्रक्रियेत घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. या सर्व बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल,
असा इशारा ओबीसी चळवळीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. प्रा हाके म्हणाले, संविधानाने सामाजिक न्यायाची संकल्पना स्वीकारून वंचित, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि ओबीसी समाजाला समान संधी मिळावी म्हणून आरक्षणाचे धोरण लागू केले आहे. समाजात जोपर्यंत सर्वांना समान शिक्षण, समान संधी आणि समान वागणूक मिळत नाही, तोपर्यंत आरक्षणाची गरज कायम राहणार आहे.
सोशल मीडियावर आरक्षणविरोधी वातावरण निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून तरुणांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शहरातील कॉन्व्हेंट शाळेत शिकणारा विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील एकशिक्षकी शाळेत शिक्षण घेणारा शेतकर्याचा मुलगा यांच्यात समान स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक विषमता दूर होईपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळी अधिवेशनात ओबीसी, भटके-विमुक्त आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर पुरेशी चर्चा झाली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली. ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे सांगत राज्यभर जनजागृती अभियान सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याऐवजी खासगी शिक्षण संस्थांना चालना मिळत असून सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोपही प्रा. हाके यांनी यावेळी केला.





